मुंबई प्रतिनिधी, १० जून २०२१ :-  पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक आज पूर्वपदावर आली आहे. मात्र हवामान खात्याकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सायन आणि हिंदमाता भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे आज या दोन्ही भागात महानगरपालिकेचे विशेष लक्ष असणार आहे. सायनमध्ये तीन तांत्रिक पंप बिघडले आहेत. 

       मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी २ एनडीआरएफ तैनात केल्या आहेत. जर आज पुन्हा पावसामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली तर तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. मुंबईचा उपनगरांमध्ये जवळपास पाच हजार तीनशे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक डॅशबोर्ड तयार करण्यात आलेला आहे. या डॅशबोर्डवर मुंबई महानगरपालिकेचे लक्ष असणार आहे. ज्या भागात पाणी जास्त प्रमाणात भरलेल्या त्या ठिकाणी तात्काळ व्यवस्था पोहोचावी यासाठी पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.             काल मुंबईत ३२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज रायगडला रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. १२ ते १३ जूनला मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पाणी तुंबण्याचे ३५० स्पॉट आहेत तर यापैकी ४० स्पॉटवर महानगरपालिकेचे विशेष लक्ष असणार आहे.