आपल्या धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. एखाद्या धर्माच्या प्रचारकांनी दुसऱ्या धर्मांची अवहेलना करु नये असे न्यायमूर्ती एच.पी. संदेश यांनी आपल्या सुनावणीत सांगितले.
   एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर हा खटला सुरु होता. या महिलेची तक्रार होती की, दोन ख्रिश्चन व्यक्ती महिलेच्या घरी आले आणि त्यांनी तिला आपल्या धर्माबद्दल सांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी इतर धर्म आपल्या धर्माप्रमाणे महान नाहीत अशा पद्धतीने तिला पटवून देण्याची सुरुवात केली. ह्या दोघांनीही भगवद् गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे या महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा या दोन आरोपींवर दाखल केला. त्यांनतर आपल्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याने हा खटला रद्द करावा यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, कोर्टाने दोन्ही बाजू समजून घेत हा निकाल दिला आणि आरोपींची मागणी फेटाळून लावली आहे.