महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे बुधवारी रेडिसन ब्लू हॉटेलमधून कामाख्या मंदिरात पोहोचले. त्यांच्यासोबत तीन ते चार आमदार दिसले. मंदिरात शिंदे यांनी आरती करून पूजा केली.

मंदिराबाहेर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्या सर्व आमदारांसह मुबंईत येणार असल्याचे सांगितले. यासोबतच विधानसभेतील फ्लोअर टेस्टच्या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी उद्धव सरकारच्या विरोधात फ्लोअर टेस्टची मागणी करत राजभवन गाठले. राज्यपालांनी फ्लोअर टेस्टची नोटीस दिल्यास उद्धव सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते.

26 जून रोजी सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, उपाध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. याप्रकरणी न्यायालयाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.

उद्धव सरकार अल्पमतात, बहुमत सिद्ध करा

मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येथून ते सायंकाळी मुंबईत पोहोचले आणि आमदारांसह राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस राजभवनाबाहेर म्हणाले- उद्धव सरकार अल्पमतात आहे, बहुमत सिद्ध करावे.