मुंबई प्रतिनिधी, २२ जुलै २०२१ :- शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. काल रात्री कसारा घाटात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाल्याचं दिसत आहे. टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नाशिक आणि पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली. तर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

   दरड कोसळल्याची माहिती मिळताच भरपावसात रेल्वे ढिगारा बाजूला हटवण्याचं काम हाती घेतलं. यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नजर ठेवून आहेत. तातडीने रेल्वे वाहतूक सुरू करता यावी, यासाठी दरड हटवण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात असून, त्यासाठी मातीचे ढिगारे हटवणाऱ्या ट्रेन्स, विविध मशिन्स आणि मजूर सध्या काम करत आहेत.

     दरड कोसळल्यानंतर टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा या दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंतची रेल्वे वाहतूक सुरू आहे.

      अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हुजूर साहेब नांदेड स्पेशल या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही रेल्वे गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. काही रेल्वे गाड्या दुसऱ्या मार्गांवरून चालवण्यात येणार आहेत. कल्याण, कसारा आणि इगतपुरी येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. रेल्वे वाहतूक सुरू होईपर्यंत कसारा, इगतपुरी येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.