कोल्हापूर प्रतिनिधी, २ सप्टेंबर २०२१ :- कोल्हापूर जिल्हयातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटला आहे. मेघोली ग्रामस्थांनी रात्री उशीरा याबाबत माहिती दिली आहे. बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा लघू पाटबंधारे प्रकल्प आहे. या पाण्याच्या प्रवाहात सापडल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला असून शेकडो एकर शेतजमीन वाहून गेली आहे.

     दरम्यान या प्रकल्पातील पाण्यामुळे आता वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून वेदगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रात्री या बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

    दरम्यान, पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारपासून (1 सप्टेंबर) पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. कोल्हापूरच्या प्रयाग चिखली ते नरसिंह वाडीपर्यंत ही पंचगंगा परिक्रमा निघणार आहे. तब्बल 5 दिवस चालणाऱ्या या परिक्रमेत हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिक एकवटले आहेत. शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 5 सप्टेंबर रोजी पूरग्रस्तांसह जलसमाधी घेऊ, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

  राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्येच त्यांनी पंचगंगा परिक्रमेचा इशारा दिला होता. पण सरकारने या मोर्चाची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी आज पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. आज सकाळी प्रयाग चिखलीपासून ही पंचगंगा परिक्रमा सुरू झाली. त्यांनी प्रयाग संगमावरील दत्ता मंदिरात आल्यावर अभिषेक केला. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेचा नरसोबाच्या वाडीत समारोप होणार आहे. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.