प्रतिनिधी, १५ जुलै २०२१ :- काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात खासगी कामासाठी सरकारी पैशाने विमान प्रवास केल्याचा आरोप भाजपने केला होता. या प्रकरणी भाजप नेते विश्वास पाठक यांच्या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नितीन राऊतांना 28 जुलैपर्यंत उत्तर देण्यास हायकोर्टाने सांगितलं आहे. विमान प्रवासासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केलेली रक्कम परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती विश्वास पाठक यांनी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

     सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 406, 409 अन्वये नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा अर्ज पाठक यांनी मार्च महिन्यात वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दिला होता. लॉकडाऊनच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई-नागपूर, तर 9 जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर , दिल्ली असा चार्टर्ड फ्लाईटने प्रवास केल्याचे माहिती अधिकाराच्या अंतर्गत ‘महानिर्मिती’कडून समजल्याचा दावा पाठक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

   हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशा पद्धतीने खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसाचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणाकडे मंत्र्याने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासावर खर्च करण्यासाठी पैसा आहे, अशी टीकाही पाठकांनी केली होती.

    ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व नियम मोडून हा विमान प्रवास केला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून हटवावे अशी मागणी विश्वास पाठक यांनी केली होती.