रत्नदीप शेजावळे
(दि-०२/०५)

राज्यात पूर्वीपासूनच तंबाखु आणि तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करण्यास पुर्णतः बंदी आहे.  एरवी पानटपरीतुन चोरीछुपे विक्री होणारे गुटखा सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत होते. लॉकडाऊन काळात तंबाखूजन्य पदार्थांचा तुटवडा जाणवत असला तरी तंबाखू शौकीनांचे गायछापवरचे प्रेम कमी झालेले दिसत नाही. राज्यात सर्वाधिक लोकप्रिय मालपाणी ग्रूपची निर्मिती असणाऱ्या गायछाप तंबाखु खाण्याला अद्यापही ब्रेक बसलेला नाही. राज्यात तंबाखु शौकीनांची सर्वाधीक पसंती असणाऱ्या "गायछाप आणि सूर्यछाप तोट्याच्या किंमतीतही कमालीची वाढ झालेली दिसून येते. एरवी दहा रुपयांत मिळणारी गायछाप आता तीस ते चाळीस रुपयांना आणि पाच रुपयांत मिळणारा सुर्यछाप जर्दा (तोटा) पंधरा रुपयांत, दहा रुपयांत मिळणारे मट्रेल (खर्रा) आणि गोल्डफ्लॅक सिगारेट वीस रुपयांत तर एक रुपयांची चुना डब्बी तीन ते पाच रुपयांना चोरीछुपे विक्री होत असल्याचे दिसत आहे. मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम आहे.राज्यात तंबाखू विक्रीवर पुर्णतः बंदी आहे. एरवी छुप्यामार्गाने येणारी सुपारी तंबाखु गुटखा आणि सिगारेटची आयात बंद झाल्याने मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.परंतु ज्या ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांकडे तंबाखुजन्य वस्तूंचा साठा आहे, ते व्यापारी या लॉकडाऊन आड चांगलेच हात धुवून घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी जिंतूरच्या भाजी मंडईतील दुकाना समोर खुली तंबाखू विकणाऱ्यावर कारवाई केल्याने तूर्तास खुल्या तंबाखुवर तलफ भागविणाऱ्या शौकीनांची मोठी पंचायत झाली आहे. येत्या दोन दिवसांत ग्रीनझोन मधील दारूची दुकाने आणि पानटपरी उघडण्या बाबत परवानगी देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती आहे.