रत्नदीप शेजावळे
जिंतूर(२२/०७)

जिंतूर शहर आणि तालुक्यात काल बुधवार (दि-२१) रोजी दुपारी आणि मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे, रात्रभर पावसाची संततधार सुरूच असल्याने अनेक ठिकाणी घरात आणि शेतात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूचे नुकसान होऊन शेती अवजारे वाहून गेले आहेत.

काल मध्यरात्री नंतर झालेल्या मुसळधार पावसामूळे रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहने पाण्यासोबत थोड्यादूर वाहून गेले आहेत. त्यात एक कार वाहून गेली तर दुसरी कार विजेच्या खांबावर जाऊन अडकली तर दुसरिकडे एक कार भिंतीवर जाऊन धडकली.यात एक दूचाकी कारच्या खाली अडकवून पडली होती, काल रात्री शहरातील अनेक भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. दर्गा परिसर,सटवाई मंदिर,साखरतळा रोड बिरसा मुंडा चौक,वीटभट्टी परिसर, जुना मारोती मंदिर परिसर याभागात नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. 

🔴वरुड नृसिंह संपूर्ण शिवार पाण्याखाली..

गेल्या चाळीस वर्षांनंतर आज वरुड (नृ) येथील गावालगतचा पूल काठोकाठ वाहत होता, शिवारातील शेतांत पाणी साचल्याने संपुर्ण शेतीपीक पाण्याखाली गेले आहे. यात ठिबक सिंचन,शेती उपयोगी साहित्य,शेती औजारे,जनावरांचे खाद्य साहित्य, कडबा वळई, वाहून गेले आहेत. नृसिंह मंदिर परिसर आणि संपूर्ण गाव जलमय झाले आहे.गावालगतचा वडाळी तलाव काठोकाठ भरल्याची माहिती मिळाली आहे.

🔴पोलीस वसाहतीत पाणी शिरले..
पोलीस कुटुंबियांची रात्रभर 'पेट्रोलिंक'

जिंतूर शहरातील पोलीस वसाहतीत जवळपास 36 क्वार्टर आहेत, रात्रीच्या संततधारीने वसाहती समोरून मुख्य रस्त्यालगतचा नाला तुंबल्याने संपूर्ण वसाहतीत पाणी शिरले आणि चार ते पाच घरे वगळता ईतर सर्व घरात कुठे जमिनीवरून तर कुठे सिमेंट पत्र्यातुन पावसाच्या पाण्याचा शिरकाव रात्रभर सुरूच होता. त्यामुळे संपुर्ण पोलीस कुटुंबाला रात्र जागून काढावी लागली आहे. नगर परिषदेला नालेसफाई करण्याची वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप, पोलीस वसाहत वासियांनी केला आहे.