रत्नदीप शेजावळे
जिंतूर (१२/०७)

गेल्या वर्षभरापासून जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असणाऱ्या गावाला तीन किमी पर्यंत पक्का डांबर रस्ता मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनासोबत गावकरी कागदोपत्री त्यांच्या भावना पोहचवीत आहेत. परंतु या गावकऱ्यांच्या या मागणीला कागदी घोड्यांच्या टाचेत अडकवुन ठेवले जात आहे. परिणामी या गावातील आणखी एका वृध्द आजीला रस्त्याअभावी तिचा प्राण गमवावा लागला आहे.

अधिक माहिती अशी कि, मागच्या आठवड्यात माळरानाचा चिखल एक नऊ महिन्याची गरोदर महिला पायी चिखल तुडवीत तीन किमी चालत आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा आवाक झाला होता. त्यानंतर याच गावातील वृद्ध महिला पार्वतीबाई महादु ढाकरे (वय-६५) यांना  शुक्रवारी(दि-०९) रोजी रात्री झोपेत असताना अर्धांगवायुचा झटका आला, पण सतत दोन दिवस सारखा  पाऊस सुरु असल्याने गावात गाड़ी येणे कदापी शक्य नव्हते उपचारासाठी उशीर झाला होता. तरीही गावातील खाजगी जीप चालक भीमराव ढाकरे यांनी मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन गाडी चीखलातून तीन किमी बाहेर काढत जिंतूरचा रस्ता धरला. पुढे सुलतानपुर या ठिकाणी खाजगी दवाखाना गाठला परंतु तिथे पोहचण्यासाठी खुप उशीर झाल्याने डॉक्टरांनी वृद्ध महिलेचा मेंदू काळा पडल्याचे सांगीतले काल रविवार  (दि-११) रोजी सकाळी त्या वृद्ध महिलेचा मृत्यु झाला आहे. 

परभणी जिल्हा प्रशासन या बाबतीत केवळ रस्ता मंजुरीचे कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्ष कृती आदेश बजावत नसल्याने गावकऱ्यांत प्रचंड संतापाची लाट आहे. 02 जुलै रोजी झालेल्या आंदोलनामध्ये आठ दिवसांत रस्त्याचे भूमिपूजन करण्याचे आश्वासन दिले होते. पुढे  लवकरच व्यापक आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याचे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आहे.