मार्च 2019 मध्ये महापरीक्षा पोर्टलअंतर्गत जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गट क्रमांकामधील 18 संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेविका या 5 वर्गांसाठी जाहिरातीत नमूद सर्व रिक्त पदांच्या भरतीस शासनाने मान्यता दिली आहे.
      राज्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव व इतर साथरोगाची शक्यता लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ आरोग्यसेवा मिळावी म्हणून क वर्गातील विविध 5 संवर्गांतील 13 हजार 514 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीत मराठा उमेदवारांना खुल्या किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून नव्याने अर्ज व शुल्क दाखल करावे लागणार आहे. तसेच भरतीत यापूर्वी दिलेल्या 3% दिव्यांग आरक्षणाबद्दल बदल करून 4% प्रमाणे आरक्षण निश्चित करून घ्यावे. दिव्यांगांसाठी उपलब्ध होणाऱ्या पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. भरतीत एसईबीसी म्हणजेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण ठेवून जाहिरात प्रसिद्ध केली असल्यास अशा प्रकरणी एसईबीसी प्रवर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या प्रवर्गात रूपांतरित करण्याबाबत सामान्य प्रशासनाने मान्यता दिलेली आहे.