एका २६ वर्षीय अभियंता युवतीचे पावणेदोन वर्षांपूर्वी अमरावतीमधील रुख्मिणीनगर परिसरातील अभियंता युवकासोबत लग्न झाले. लग्नानंतर काही महिन्यांचीच पीडितेला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन ४० लाखांची मागणी करण्यात आली. तसेच लग्नापूर्वी 'तुझे प्रेमसंबंध होते, ते मी सर्वांना सांगून माझ्या मुलापासून तुला घटस्फोट देईल', अशी धमकी देवून पीडितेच्या सेवानिवृत्त प्राचार्य सासऱ्याने तिच्यावर सुमारे सहा ते सात महिने अमरावती, धुळे व पुणे येथे वारंवार लैंगिक अत्याचार केले. अखेर पीडितेने सासऱ्याच्या घाणेरड्या कृत्याचा स्वत:च मन कठोर करुन व्हिडिओ काढला. हा संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम पीडितेच्या मामाने रविवारी (दि. २४) येथे पत्रकार परिषदेत सांगितला. नात्याला काळीमा फासणाऱ्या या सासऱ्यासह त्याला साथ देणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

पीडित युवतीने मामाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी १५ एप्रिल २०२२ रोजी धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सासऱ्यासह पीडितेचा पती व सासूला अटक करण्यात आली. या युवतीचा अमरावतीच्या तरुणासोबत २४ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांतच सासू व सासरे यांनी छळ करणे सुरू केले. तिच्याजवळील दागिने हिसकावण्यात आले. चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यात येत होती. पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून ४० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येत होती.

मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी तगादा लावण्यात येत होता. लॉक डाऊन काळात पीडित विवाहिता वर्क फ्रॉम होममुळे सासरी अमरावतीत होती. या काळात सेवानिवृत्त प्राचार्य असलेल्या सासन्याची तिच्यावर वाईट नजर पडली. सासऱ्याने चारित्र्यावर संशय घेऊन तिला घरून हाकलून देण्याची धमकी दिली तसेच तुझे लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधाची सगळ्यांना माहिती देवून मुलाला घटस्फोट देण्यास भाग पाडतो, असे सांगितले. पीडितेने माझे लग्नापूर्वी काहीही नव्हते, असे वारंवार सांगितले. मात्र सासरा काही ऐकत नव्हता.

तसेच पीडितेला महिन्याचे वेतनही आपल्या खात्यात जमा करण्यास भाग पाडण्यात आले. या काळात पीडित विवाहिता सासरच्या मंडळींसोबत माहेरी धुळे येथे गेल्यावर सासऱ्याने तिच्या माहेरी जावूनच १५ जुलै २०२१ ला लैंगिक शोषण केले. अमरावतीत आल्यावर सासन्याच्या छळात आणखी वाढ झाली. तो संधी मिळेल, तेव्हा सुनेसोबत अश्लील कृत्य करू लागला. पीडित विवाहिता घरी एकटी असताना सोसल्याने तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले.