मुंबई प्रतिनिधी, १४ जुलै २०२१ :- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील कार्यालयात मंगळवारी शेकडो कार्यकर्ते जमले होते. पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत केलेल्या गर्दी प्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांना मंत्रीपदाचा पदभार सोपवला गेला. विस्तार करण्यापूर्वी सर्वत्र भाजपच्या बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत होतं मात्र त्यांचं नाव डावलण्यात आल्याच्या कारणांवरुन समर्थकांमध्ये नाराजी होती. खदखद व्यक्त करण्यासाठी आणि एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी वरळीत पंकजा मुंडेंच्या कार्यालयात मंगळवारी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. पंकजा मुंडे यांनी वरळीत यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. गर्दी जमवल्या प्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींना नोटीस देऊन पोलिसांनी सोडलं.

       दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवतानाच महाराष्ट्र भाजपातील राजकारणावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मात्र, पक्षातच सक्रिय राहण्याचे संकेतही त्यांनी दिले. “मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही. मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे” असं पंकजा म्हणाल्या.