सोलापूर : नागपूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून नागपूरचा लॉकडाउन 14 मार्चपर्यंत वाढविला आहे. तर काही जिल्ह्यांनी लॉकडाउनच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र, 14 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे. त्यामुळे पूर्वनियोजित सर्व परीक्षा कोरोनाचे नियम घेतल्या जातील,  असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यसेवेची पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च रोजी होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यभरातील सुमारे आठशे केंद्रांवरून सरासरी 12 लाखांपर्यंत उमेदवार एमपीएससीची परीक्षा देणार आहेत. ज्या जिल्ह्यांनी लॉकडाउन केलेला आहे, अथवा परीक्षा कालावधीत लॉकडाउनचा निर्णय झाल्यास, या परीक्षासाठी विद्यार्थ्यांना त्यातून सवलत द्यावी, असे स्पष्ट निर्देश शासन स्तरावरून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व पोलिस आधीक्षकांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी राष्ट्रीय, राज्य अथवा विद्यापिठीय परीक्षकांना परवानगी असल्याचे लॉकडाउनच्या आदेशात नमूद केले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव काही जिल्ह्यांमध्ये वाढू लागला आहे. त्यामध्ये सोलपूर, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडित व्हावी, या हेतूने काही जिल्ह्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला. नागपूरमध्ये 7 मार्चएवजी आता 14 मार्चपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातही  लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे  लॉकडाउन काळात परीक्षा केंद्रपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जागोजागी पोलिसांची नाकाबंधी आणि प्रवासी नसल्याने बंद असलेल्या वाहतुकीमुळे त्यांना अडचणी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय, राज्य अथवा विद्यापीठांच्या पूर्वनियोजित परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना सवलत दिली जाणार आहे. जेणेकरून ते परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचू शकतील, असा त्यामागे हेतु आहे.