प्रतिनिधी, २१ जानेवारी २०२२ :- महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून मतदारांना दाखवण्यासाठी का होईना स्थानिक नगरसेवक आता झोपेतून जागे होऊन स्थानिक प्रभागातल्या समस्या सोडवण्याचं काम नगरसेवकांनी सुरू केलं आहे त्याचबरोबर केलेल्या कामाचं श्रेय नावावर करण्याचं ही काम सुरू झालं आहे. पुण्यातील कात्रजमधील प्रभाग क्र. ३८ मध्ये उत्कर्ष सोसायटीतील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये चांगलंच वाद जुंपला होता. या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वादविवाद सुरू झाला.

    उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम आणि भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे.

    कात्रज तलाव प्रवेशद्वार ते शेलारमळा, गुजरवस्ती, महादेवनगरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने मोठी वाहतूक असते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ता विकसनाची मागणी जोर धरत होती.