मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. चित्रपटानं आता ५० कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. वेड चित्रपटाची कथा,संवाद,गाणी..सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय,दिग्दर्शन आणि निर्मिती  मूल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली.  आणि याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं 'वेड' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता वेळ आहे एक पाऊल पुढे जाण्याची..काहीतरी नेहमीपेक्षा हटके करण्याची.

म्हणूनच लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच 
रितेश-जिनीलियाच्या 'वेड' चित्रपटामुळे घडून येणार आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्या नंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात सामिल केलं नव्हतं.  मराठी इंडस्ट्रीतच काय तर अगदी बॉलीवूड,टॉलीवूडमध्ये देखील हे घडलं नव्हतं.  पण 'वेड' चित्रपटात आता सत्या(रितेश देशमुख) आणि श्रावणी(जिनीलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं 'वेड तुझे..' या गाण्याचं नवं व्हर्जन सामिल करण्यात येणार आहे, आणि सोबत काही नवे सीन्सही चित्रित करून सामिल करण्यात आले आहेत.  येत्या शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी,२०२३ पासून चित्रपटगृहात 'वेड' पाहताना आता या नव्या गाण्याचा आनंदही प्रेक्षक लुटू शकणार आहेत. 

रितेश-जिनीलिया हे जोडपं केवळ ऑन स्क्रीन नाही तर ऑफ स्क्रीनही चाहत्यांचं फेव्हरेट आहे. त्यामुळे नेहमीच त्यांना एकत्र पाहणं सगळ्यांना आवडतं. 

'वेड' चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आणि पुन्हा एकदा प्रेक्षक यांच्या केमिस्ट्रीच्या प्रेमात पडले. रितेशनं साकारलेला 'सत्या' आणि जिनीलियानं साकारलेली 'श्रावणी' सर्वांनाच आपलं वेड लावून गेली. त्यामुळे आता दोघांवर नव्यानं चित्रित केलेलं  वेड तुझे हे गाणं देखील सर्वांची वाहवा मिळवून जाणार यात शंका नाही. चित्रपटात आधी 'वेड तुझे..' हे गाणं रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. त्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली. त्यामुळे आता रितेश-जिनीलियाच्या 'वेड तुझे..' या गाण्याच्या नव्या व्हर्जनला देखील  रसिक चाहते उचलून धरतील अशी आशा आहे. 


'वेड' चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं अन् तत्क्षणीच अजय-अतुलच्या संगीतानं नेहमीप्रमाणे रसिकांवर मोहिनी घातलेली आपण पाहिली. चित्रपटातील गाण्यांना अल्पावधीत उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत याचं पूर्ण श्रेय अर्थातच आपले लाडके संगीतकार अजय-अतुल यांना जातं. सोशल मीडियावर तर 'वेड' चित्रपटातील गाणी अजूनही ट्रेन्डिंगवर आहेत. 'वेड लागलं...' या गाण्यावर तर रील्सचा पाऊस अजूनही तितकाच वेगानं पडताना दिसत आहे. त्यामुळे आता रितेश-जिनीलियावर चित्रित झालेलं 'वेड तुझे..' गाण्याचं नवं व्हर्जन चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट ठरणार हे नक्की.