मुंबई प्रतिनिधी, २८ ऑगस्ट २०२१ :- अंबरनाथमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका दुकानदार महिलेचं मंगळसूत्र खेचून पळून गेल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात हा प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याच्या अगदी समोरच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचं घर आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आशा यांचा गोंधळ ऐकून अरविंद वाळेकर यांच्या सुरक्षारक्षकांनीही बाहेर धाव घेतली. मात्र तोवर हे चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर यापूर्वी शिवसेना शहरशाखेत जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे त्यांच्याभोवती सतत सुरक्षरक्षकांचा गराडा असतो. तर त्यांच्या घरालाही २४ तास सुरक्षारक्षकांचा वेढा असतो.

     अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवलीमधील शिवलिंग नगर परिसरात आशा कराळे यांचं दुकान आहे. या दुकानात त्या टेलरिंगच्या कामासह किराणा मालाची विक्री करतात. गुरुवारी दुपारी आशा या त्यांच्या दुकानात काम करत असताना लाल रंगाच्या स्कूटरवरून दोन सोनसाखळी चोर या परिसरात आले. सुरुवातीला त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर आशा यांना हेरून त्यांच्या दुकानात जात बिस्किटाचा पुडा मागितला. यावेळी एक चोरटा आशा यांच्या दुकानात बिस्किटाचा पुडा घेण्यासाठी गेला, तर दुसरा चोरटा गाडी चालू करून आशा यांच्या दुकानाबाहेर थांबून राहिला. यावेळी आशा या दुकानाच्या काउंटरमधून बिस्किटांचा पुडा काढून देण्यासाठी खाली वाकल्या असता चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचं मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या घटनेनंतर आशा यांनी आरडाओरडा करत रस्त्यावर धाव घेतली.

   या प्रकरणाबाबत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना विचारलं असता, सोनसाखळी चो घ प्परी आणि परिसराची सुरक्षा या गोष्टींचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच आमची गस्त ही वेळोवेळी सुरूच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.