प्रतिनिधी, १३ जानेवारी २०२२ :- बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात कॅनॉल पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ उपोषणाला बसले.  तालुक्यातील सर्वात मोठे धरण पेनटाकळी प्रकल्प आहे. त्यातील पाणी सिंचनाकरिता मिळावे म्हणून मोसंबी वाडी, मिस्कीन वाडी, निंबा, गोमेधर, जानेफळ, उटी, घाटनांद्रा, बोथा आणि  वरवंड येथील बांधवांनी रब्बी पिकाकरिता जी आरक्षित पाणी असते ते सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली. यानंतर उटी येथील शेतकरी संजय सुळकर, घाटनांद्रा येथील रावसाहेब देशमुख, संजय राठोड, श्याम देशमुख, संतोष साखरे व आदी शेतकरी बांधवांनी गोमेधर शिवार मेनगेट जवळ गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. 
      आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र अद्यापही कुठल्याच अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेट दिलेली नाही, अशी माहिती उपोषणकर्त्यांकडून मिळाली आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या मागणीवर  तोडगा निघाला नाही तर पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर हे आंदोलन करणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी म्हंटल आहे. शुक्रवारी म्हणजेच उद्या   मेहकर ते खामगाव  रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ही शेतकऱ्यांनी दिला आहे.  लवकरात लवकर जर पाणी सोडण्यात आले  नाही तर शेतकऱ्यांची पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत आणि समोर येणाऱ्या काळात पाणीटंचाई या क्षेत्रामध्ये होऊ शकते यावर प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे.