प्रतिनिधी, १२ जुलै २०२१ :- मराठा आंदोलनासंदर्भात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे राज्यसरकारने सरसकट माफ केले आले आहेत. गुन्हे मागे घेतल्याने खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. 

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेत सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती. स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही संभाजी छत्रपती यांचे आभार मानले आहेत.