मुंबई प्रतिनिधी, २३ नोव्हेंबर २०२१ :-  Mumbai Municipal Corporation Election 2021 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका आता जवळ येत आहेत. यात तुमच्या समस्या जाणून घेण्याचा दिखावा केला जाईल, कित्येक आश्वासन दिली जातील मात्र त्यानंतर प्रत्यक्षात त्या दिलेल्या आश्वासनाची अमलबजावणी करण्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या मागे आपल्यालाच चपला घासायला लागणार हे तर नक्की कारण हेच तर चालत आलेलं समीकरण आहे. रोज टीव्ही,वृत्तपत्रात आम्ही निवडून आल्यावर काय बदल झाले किंवा नंतर काय बदल होतील ते दाखवून मतदात्याचे म्हणजेच तुमचं आमचं मन वळवण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि ते पाहून ,वाचून आपण मतदान करणार की 2022 मध्ये तरी आपल्या मानसिकतेत बदल करून मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

     आज सुद्धा मुंबईतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रस्ते,अनेक ठिकाणी पावसात साठणारे पाणी,मूलांना आज ही खेळण्यासाठी उपलब्ध नसणारी मैदाने. जी मैदाने होती तीही बिल्डरच्या घशात घालण्यात आली. मुंबईत सतत होणारी वाहतूक कोंडी आणि त्यात होणारा मनस्ताप. रोज 1,2 तास तरी यात जातो. अनेक भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या तर कुठे शौचालयाची समस्या.

    आज सुद्धा मुंबईत अनेक पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे या कडे दुर्लक्ष केले जाते. मुंबईत अनेक ठिकाणी गांजा,चरस ,अवैध दारू,गुटखा विक्री सरास सुरूच आहे. आता हे अनधिकृत धंदे दिवसा ढवळ्या ही सुरू असतात. मात्र याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचं ही समजतंय कारण आताची परिस्थिती पाहिली तर या सर्व अवैध धंद्यात राजकीय नेत्यांची तरी नावं येत आहेत नाहीतर त्यांच्या नातेवाईकांची. 

     सरकारी शाळेचे होणारे कमी प्रमाण व खाजगी शाळेतील वाढते फीचे प्रमाण यामुळे येणाऱ्या काळात कित्येक गरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहतील की काय असे चित्र दिसत आहे. आरोग्य विषयावर चर्चा केली तर यात अनेक ठिकाणी गंभीर स्थिती दिसून येते अनेक सरकारी हॉस्पिटलमध्ये लागलेल्या रांगा, दवाखान्यात उपलब्ध नसलेल्या सुविधा हे नेहमीच पहावयास मिळते. अशा अनेक गंभीर प्रश्नावर जनता कधी मतदान करणार की फक्त पैसे,जातीच्या नावावर मतदान करून स्वतः परत भिकेला लागणार हे पाहावे लागेल. मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध असणे गरजेचे आहे मात्र तेही कुठे दिसत नाही. मुंबईत अनेक ठिकाणी पुनर्वसनाच्या नावाखाली झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे हाल होताहेत. वेळोवेळी नागरिकांना भाडे, खोलीचा ताबा लवकर मिळत नाही. स्वतःची जागा सोडून बाहेर डोक्यावर हव्या असलेल्या छपराच्या शोधात भटकत राहावे लागते. अशा एक नव्हे अनेक समस्या आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उमेदवार वा निवडून आलेला प्रतिनिधी स्वतःचाच पोट भरण्यात व्यस्त असतो.

     निवडणूका आल्या की आमचं सरकार किंवा आमच्या पक्षाने किती काम केलं आहे याची जाणीव करून दिली जाते मात्र प्रत्यक्षात ते काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचले आहे का ? याची दखल कोणताच पक्ष किंवा सरकार घेत नाही. जर राजकीय पक्षाला खरंच सर्वसामान्यांचे मत हवे असेल एखाद्या तरी पक्षातील नेत्याने सर्वसमन्यांसारखी प्रत्येक गोष्टींसाठी वणवण करून पहावी. फक्त लाखोंच्या गर्दीत स्टेज वर भाषण देणं व राजकारण करणं सोपी असतं मात्र त्याच राजकारणामुळे मग ते जातीच राजकारण असो वा दुसरं कसलं या सगळ्यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जातो हे लक्षात ठेवा. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि जबाबदारी सुध्धा मात्र हे अनमोल मत या सर्व गोष्टींचा विचार करून द्यावं

- जागृत महाराष्ट्र टीम