पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज खासदार संभाजीराजे  यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यात, शाहू महाराजांचे वंशज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप वेळ चर्चा झाली. मराठ्यांना आरक्षण मिळावं हिच आमची भूमिका असल्याचं दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर म्हटलं आहे. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली.

संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. भेट घेण्यामागे जातीय विषमता कमी करता येईल, बहुजन समाज एका छताखाली राहील, हे कारण आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण हा एक भेटीचा भाग होईल. शाहू महाराज यांनी सुरुवातीला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा होती, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.