मुंबई प्रतिनिधी, २ सप्टेंबर २०२१ :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच मुंबईमध्ये आता नवं संकट डोकं वर काढत आहे. सध्या मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. सातत्याने बदलणारे वातावरण आणि पाऊस या दोन्ही रोगांच्या प्रसारसाठी पोषक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    ऑगस्ट महिन्यात मुंबईत मलेरियाचे 790 तर डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले आहेत. यंदा शहरात आतापर्यंत डेंग्यूच्या एकूण 209 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद करण्यात आली. याशविया, गेल्या आठ महिन्यांत गॅस्ट्रोच्या 1848 रुग्णांची नोंद झाली.

       डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर पालिका प्रशासनाकडून संबंधित परिसरांमध्ये वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. कीटकनाशक विभागाने 13 लाख 15 हजार 373 घरांची पाहणी केली असून 11 हजार 492 डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत.

        जानेवारी महिन्यापासून मुंबईत मलेरियाचे 3338, लेप्टोस्पायरोसिसचे 133 रूग्ण, डेंग्यूचे 209, गॅस्ट्रो आजाराचे 1848 रुग्ण आढळून आले आहेत. तर काविळीचे 165 आणि स्वाईन फ्लू आजाराचे 45 रुग्ण सापडले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी (बी), परळ(एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम(एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत.