मुंबई:मशिदर्दीवरील भोंग्यांवरून राज्यभरात आज मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. पुण्यात खालकर मंदिरात आज मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचे पठन केले. या मंदिराच्या बाजुलाच मशिद असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठन होताच काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, राज्यातील आजच्या स्थितीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या निवासस्थानामधून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस देशपांडे यांच्याकडे पोहोचेपर्यंत ते आपल्या गाडीत बसले होते. त्यानंतर पोलिसांनी वेगाने धाव घेत त्यांना गाडीतून ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत गाडीचा धक्का लागल्याने एक महिला पोलिस कर्मचारी खाली पडून जखमी झाल्या. तेव्हाच संदीप देशपांडे यांनी आपल्या गाडीतून पळ काढला. दरम्यान, या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या घरासमोरच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती...धुळ्यातदेखील मशिदींसमोर भोग्यावरून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत 10 ते 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.