मुंबई प्रतिनिधी, १२ जुलै २०२१ :- काहीं दिवसांपासून १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते मात्र आजपासून मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात लहान मुलांसाठीच्या कोरोनावरील लसीच्या चाचणी प्रक्रियेला यशस्वीरीत्या सुरुवात करण्यात आली आहे. झायडस कॅडिलाने नायर रुग्णालयाला लस चाचणीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या चाचणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

  आजपासून सुरू झालेल्या लसीकरण चाचणीसाठी दोन मुलांची नोंद करण्यात आली आहे. या चाचणीत एकूण 50 मुलांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. झायडस कॅडिला कंपनीची झायको-डी ही लस लहान मुलांना दिली जाणार आहे. एकूण तीन डोस लहान मुलांना दिले जाणार आहेत. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 28 व्या तर तिसरा डोस 56 व्या दिवशी दिला जाईल, असं नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं.

     ज्या मुलांना सहव्याधी नाही आणि त्यांच्यात अँटिबॉडीज नाहीत, अशा मुलांना या चाचणीत सहभाग दिला जातो आहे. लस चाचणीत सहभागी होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना पाठवावे, असे आवाहनही मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.