मुंबई प्रतिनिधी, १६ जुलै २०२१ :- मुंबई शहरासह उपनगराला पावसाने चांगलचं झोडपलं आहे. रात्रीपासूनच पावसानं धुमशान घातलं आहे. गेल्या अनेक तासांपासून हा पाऊस पडत आहे तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात देखील धुवाधार पाऊस बरसतो आहे. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचलं असून दीड ते दोन फूटांपर्यंत अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने दुचाकी आणि चार चाकींचे टायर देखील पाण्याखाली गेले तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसाने मात्र चांगलीच तारांबळ उडवली.

        जोरदार पडणाऱ्या पावसामुळे लोकलची वाहतूक कोलमडली. मध्य रेल्वेची वाहतूक स्लोवरून फास्टवर वळवण्यात आली आहे. कुर्ला – विद्याविहारची वाहतूक 20 ते 25 मिनिट उशिराने आहे असून हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिट उशिराने असल्याची माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क शिवाजी सुतार यांनी दिली आहे.