मुंबई प्रतिनिधी, २२ जुलै २०२१ :- अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झालेला उद्योजक आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या चौकशीत नवनवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला काही महिन्यांपूर्वीच या प्रकरणात अटक झालेली आहे. मात्र आरोपीशी असलेल्या नामसाधर्म्यातून घोळ घालत काही वृत्तवाहिन्यांनी वृत्तांकन करताना मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवला. त्यामुळे अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियातून संतप्त भूमिका घेत कारवाईचा इशारा दिला आहे.

    “आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन” असा इशारा अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियावरुन दिला आहे.