प्रतिनिधी, १८ जानेवारी २०२२ :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ह्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्नेहल कांबळे यांनी 'विद्यार्थी होणार पालक' हा उपक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम जाहीर करताना स्नेहल कांबळे म्हणाल्या की, शहरी भाग ( इंडिया ) आणि ग्रामीण भाग (भारत ) ह्यातील दरी कमी झाली पाहिजे असं आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे नेहमी सांगतात. त्याचवरुन प्रेरणा घेऊन आपण हा उपक्रम आयोजित केलाय. दुर्दैवाने अनेक पालक असे आहेत कि जे त्यांच्या पाल्याचा शैक्षणिक खर्च करू शकत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना ह्यामुळे शिक्षण सोडावं लागतंय. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ह्यामुळे आत्महत्या पण करतात. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. 

      या उपक्रमाची माहिती देताना स्नेहल कांबळे पुढे म्हणाल्या की, ह्या उपक्रमात विद्यार्थी हेच विद्यार्थ्याला शैक्षणिक दत्तक घेणार आहे. हा उपक्रम मुंबई आणि महाराष्ट्र अशा दोन विभागात आयोजित केला गेला आहे. मुंबई विभागातून शाळा व महाविद्यालयात शिकणारे आर्थिक सुधृड विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेतील शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्याला दत्तक घेतील तर उरलेल्या महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, कोल्हापूर , सांगली, सातारा, औरंगाबाद , नागपूर, बुलढाणा इत्यादी शहरातील आर्थिक दृष्ट्या सुदृढ विद्यार्थी ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त , अल्पभूदारक, पूरग्रस्त , ऊसतोड कामगारांच्या मुलांना / विद्यार्थ्यांना दत्तक घेतील. सगळे विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असतील ह्याची खात्री केली जाईल. 

ह्यात दत्तक घेणाऱ्या विद्यार्थ्याने दत्तक घेतले जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा एका शैक्षणिक वर्षाचा खर्च उचलायचा आहे त्यात त्या शैक्षणिक वर्षाची पुस्तकं, वह्या, बस पास चे पैसे , एक जोड चपला / बूट , छत्री , दप्तर आणि इच्छा असेल तर विद्यार्थ्यांची फी भरावी लागेल. आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक आहेत ग्रामीण भागातील ८१ व शहरी भागातील ८१ असे एकूण १६२ विद्यार्थी दत्तक घेतले जातील. ह्या उपक्रमाचा भाग होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरावा . ३ एप्रिल २०२२ पर्यंत आपण ह्या उपक्रमासाठी नोंदणी करून घेत आहोत. ह्या उपक्रमाची अजून माहिती मिळवण्यासाठी ८४३२३०३४०४ ह्या क्रमांकावर संपर्क करावा .