आगामी काळात भारतात वरील प्रमाणे वाक्य एखाद्या राजकिय नेत्याच्या किंवा सत्ता समर्थक बाबांच्या श्रीमूखातून ऐकल्यास आपल्याला आश्चर्य वाटायला नको म्हणून वरील शिर्षक आताच दिले आहे.
कारण भारतात आंबे खाल्याने मूलं होतात, शेण खाल्याने महिलांचे बाळंतपण नार्मल होतात, टाळी-थाळी वाजवल्याने विषाणू दचकतात, उघड्या नालीच्या गॅसने घराघरांत स्वयंपाक केले जातात, दिवे लावल्याने हवेतील किटाणू मरतात, गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने बीपी कमी होतो त्यामुळे उद्या एखादा स्टेटमेंट असाही येऊ शकतो की "डिग्री पुंगळी करून ढुंगणात भरली की नोकरी मिळते". भारत स्वयंघोषित विश्वगुरू होत असल्यामुळे व हा अमृतकाळ सुरू असल्यामुळे भारतात कधी कुठला ट्रेंन्ड येईल ? हे सांगता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिग्र्या पुंगळ्या करण्यास सुरूवात करावी.

बॅक दारात उभं करत नाही, भांडवल कुणी देत नाही, उधार मागितलं तर नातेवाईकांचा विश्वास नाही, अभ्यास खूप करून ठेवलाय पण सरकार नोकऱ्या काढत नाही, शिक्षकांना भेटायला जाण्याची इच्छा नाही , आता काय सुरू आहे ? हा प्रश्न वारंवार ऐकण्याची आता हिंमत नाही, हुशार होतो त्यामुळे हा परिस्थिती बदलेल म्हणून आई-वडील स्वप्न पाहतात त्यांना बहाने सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, मित्र म्हणतात काळजी करण्याचं कारण नाही, देण्यासाठी सहानुभूती शिवाय त्यांच्याकडे काहीच नाही, मोठी-मोठी पुस्तके म्हणतात प्रयत्न करणे थांबवायचे नाही, थोर पुरुषांचे विचार म्हणतात मेहनतीशिवाय सुख नाही, ढोंगी बाबा म्हणतात कर्म कर फल की चिंता मत कर, वडीलधारी म्हणतात, सब्र का फल मिठा होता है, साहित्य म्हणतो, कोशीश करने वाले की कभी हार नहीं होती.

वरचं सर्व ठिक आहे. आपल्या जागी सर्वच बरोबर आहे. पण या सर्वांमध्ये मी काय म्हणतोय? याकडे कुणाचेच लक्ष नाही. माझ्या मनातून शिक्षणावरचा विश्वास उडतोय, शिकल्यामुळे माणूस मोठा होतो या वाक्यातील सत्यता तपासण्याची वेळ आता भारतात आली आहे असे मला वाटायला लागले आहे. नेमकं कुठलं शिक्षण घेऊ ?ज्यामुळे माझं आयुष्य समाधानाने जगता येईल याचे उत्तर कुणाला देता येईल का? आम्हा शिकलेल्या विद्यार्थ्यांना सोडून तुम्ही देशाचा विकास कुठल्या पध्दतीने करणार हे एकदातरी आम्हाला कळू देणार का? मी जर देशाचा भविष्य आहे तर मग माझ्यासमोर गर्द काळोख का? विद्यार्थ्यांना परावलंबी करून देश आत्मनिर्भर कसा ? मला कमविण्याची संधीच नाही आणि त्यामुळे माझ्या शिक्षणाची आज कवडीची किंमतही नाही मग मी तुमच्या विकसित अर्थव्यवस्थेचा ग्राहक कसा ? हे सर्व कुणालातरी पटवून देता येईल का?

कदाचित मी पागल झालोय त्यामुळे असे फालतुचे विचार माझ्या मनात घोंघावत आहेत पण माझ्या सारख्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात असेच विचार येत आहेत, त्यामुळे आम्ही समविचारी तुमच्यासारख्या व्यभिचारी राजकारण्यांकडे एकनिष्ठ राहण्याचे असफल आश्वासन मागत आहोत. मला तुमच्याकडून खूप काही नकोय कारण तुम्ही सदैव उपाशी असता हे जनतेला ठाऊक आहे. मला माझ्या हक्काची भारताच्या व्यवस्थेचा एक भाग बनण्याची फक्त संधी हवी. मला त्या संधीचं सोनं करता येईल की नाही, हा माझ्या शैक्षणिक क्षमतेचा भाग झाला पण ती स़ंधीच तुम्ही तुमच्या सदैव उपाशी पोटात दडवून बसला आहात, ज्यात आम्हाला वाटा देणे म्हणजे तुमच्या करीअरला सुरूंग लावण्यासारखे होईल. राजकारण आता तुमचं करीअर बनलं आहे. तुम्ही, तुमची मुले त्यांची मुले यांचे सर्वांचे करीअर आतापासूनच बनली आहेत पण आमच्या करीअरचं काय?

आमची करीअर म्हणजे धर्माची रक्षा करणे, मंदिराचा विजयोत्सव साजरा करणे, धार्मिक योगा करणे, मिरवणुकीत झेंडा पकडणे, तुमचे असुसंगत भाषण ऐकणे, देवा-धर्माचा कायम उदोउदो करणे, दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे,सत्तेची स्तुती करणे, तुम्ही पसरविलेल्या विषयावरच चर्चा करणे, विकासाची वाट पाहणे आता एवढंच आमचं करीअर उरलं आहे.

भारत आगामी काळात तरुणांचा देश असणार आहे आणि या आधारावरच भारताला विश्वगुरू करण्याची स्वप्न राजकारणी तरूणांना दाखवत आहेत. हे स्वप्न नोकरी,आत्मनिर्भर, मेक ईन इंडिया, स्टार्ट अप अशा आकर्षक शब्दांनी सजवले गेले असल्यामुळे या स्वप्नात भारतातील तरूण सध्या रमत आहे पण या स्वप्नाबाहेरील वास्तव मात्र अतिशय भयानक असून या खोट्या स्वप्नाचा पहिला सामूहिक बळी देशातील तरूण ठरणार आहे.

देशात शेतकरी आत्महत्या हा प्रश्न आजही जसाच्या तसा असून या प्रश्नाची तिव्रता आणखी वाढत आहे. पण राजकारण्यांनो तुम्ही चिंता करू नका या प्रश्नातून आम्ही लवकरच तुमची सुटका करणार आहोत. यापुढे शेतकरी आत्महत्या हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा नसणार आहे कारण आमच्या आत्महत्या आता वाढत असून लवकरच आम्ही शेतकरी आत्महत्येच्या संख्येला मागे टाकणार आहोत.

वोटींग मशीन वर मत देतांना वाटत होतं की, मी खूप मोठा बदल करत आहे. पण हा बदल माझ्याच जीवावर उठेल हे माहीत नव्हतं. माझा राजकारणाशी काही संबंध नाही पण राजकारण्यांनी घेतलेल्या निर्णयांचा माझ्या आयुष्यावर मात्र फरक पडतोय. माझी नोकरी, माझं समाधान, माझी स्वप्न, माझं स्थान, माझं कुटुंब आणि माझा भविष्य तुमच्या घेतलेल्या निर्णयामुळे एका झटक्यात बदलते. सकारात्मक बदल आम्ही स्वीकारला असता पण हा बदल नकारात्मकतेपेक्षा अंधकारमय असून दिवसेंदिवस हा अंधार गडद होत जातोय.

माझ्यासाठी सरकार खूप काही करतेय, असे नाटक करण्याची गरज नाही. तुम्हाला माझ्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही फक्त नोकरीचे / स्थिर रोजगाराचे दरवाजे उघडा, आम्हाला व्यवस्थेत येण्याची संधी द्या, आमचं आम्ही बघून घेऊ. केवळ नोकऱ्यांनी देशाचा विकास कसं करतात ? हे आम्ही दाखवून देऊ. आम्हाला नोकऱ्या न देता, स्थिर रोजगारात सामील न करता, कुठल्या आधारावर आपण देशाचा विकास करणार आहात ? कुठल्या आधारावर देशाला विश्वगुरू बनविणार आहात ? हे अर्थशास्त्र एकदा तरी आपल्या अभ्यासातून आम्हाला कळू द्या !

दरवर्षी लाखो नोकऱ्या निघायच्या व लाखो विद्यार्थी स्थिर रोजगारात लागायचे मात्र अचानक भारतातील नोकऱ्या कुठं गायब झाल्या? दिवसेंदिवस नोकरी मिळणारे क्षेत्र संकुचित का होत आहेत? स्थिर नोकरीत असलेल्या लोकांना अचानक घरी बसण्यास का सांगितले जात आहे? साफसफाई करणाऱ्या पदासाठी उच्चशिक्षित तरूण अर्ज का करत आहेत? तांत्रिक उच्च शिक्षण घेतलेले‌ विद्यार्थी अतिशय कमी पगारावर काम का करत आहेत? आम्ही योग्य शिक्षण घेतलेले असतांनाही आम्हाला रस्त्यावर फेरीवाल्यांसारखी दुकाने लावायला का सांगितले जात आहे? काहितरी करतोय म्हणून नोकरींच्या परिक्षा घेता लगेच स्थगीत करता, निकाल लावायला उशिर करता, चुकून पास झालोच तर आर्डर आमच्या पत्त्यावर येतच नाही. हे सर्व प्रश्न आम्हाला रोज सोडवावे लागतात. आमच्या आयुष्याची ऐन उमेदीची कित्येक वर्ष अशाच प्रकारचे जीवन जगण्यात निघत आहेत.

आतापर्यंत दरवर्षी नोकऱ्या काढणारी सरकार, सरकारी उद्योग विकून मोकळी होत आहे व आता आम्हाला स्टार्ट अप सुरू करा किंवा एन्ट्रपिनरशीप सुरू करा! असं म्हणतयं. मग मी घेतलेल्या शिक्षणाचं काय लोंच घालू ? स्टार्ट अप किंवा एन्ट्रपिनरशीप देशातील तरूणांना करायला लावायची होती तर मग आधी त्यासंबंधी शिक्षण का दिलं नाही?

देशातील करोडो विद्यार्थी जे शिक्षण घेतात, तेच शिक्षण मी सुध्दा घेतलंय त्यात कुठेही स्टार्ट अप किंवा एन्ट्रपिनरशीप हे शब्द क्वचित ऐकले असतील. नोकरीच्या संध्या निघतील, मी प्रयत्न करेन व माझी शैक्षणिक ऐपत असेल तर मी नोकरीवर लागेन यासाठी व यानुसारच मी शिक्षण घेतले. मी धंदा करण्यासंबंधी शिक्षण घेतले नाही किंबहुना धंद्यासंबंधी माझा सिलॅबसच नव्हता मग मला धंदा कसा करता येईल? स्टार्ट अप करण्यासाठी ब्रॅण्ड, मार्केटप्लेस, मार्केटिंग, हॅल्युएशन, मार्जीन, रेव्हेन्यू, डाॅक्युमेंन्टेशन, ट्रेडमार्क, काॅम्पीटिशन व इतर यासंबंधी सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे का ? आता हे परत शिकणे नंतर स्टार्ट अप करने सर्वांना शक्य आहे का?

पण कमाल म्हणजे वरचं एकही राजकारण्यांच्या मुलांना लागू होत नाही. यांची मुले डिग्री घेऊन रोजगारासाठी फिरतांना दिसणार नाही. ही भारताची जगातील वेगळी ओळख असून हिच भारताला लवकरच विश्वगुरू बनवणार आहे. खंर तर! आमच्या आई-वडिलांनी हुशार व यशस्वी मुले जन्माला कशी घालतात ? याबद्दल कोणतही शिक्षण घेतलं नाही त्यामुळे आज आमची अशी अवस्था आहे. मात्र तुमच्याबाबत वेगळंच व अद्वितीय आहे. राजकारणी नेमकं कुठल्या प्रकारे संभोग करतात ज्यामुळे यांची मुले जन्मजात हुशार पैदा होतात. याबद्दल सर्व राजकारण्यांचे आपण सर्वप्रथम अभिनंदन मानायला पाहिजे.

निदान काय खाऊन संभोग करावं ? किंवा कोणत्या तिथीला संभोग करावा ? हे तरी गरीब आई-वडिलांना सांगावे जेणेकरून त्यांचीही मुले यशस्वी जन्माला येतील. राजकारण्यांचं हे गौडबंगाल निसर्गालाच माहीत. यांची मुले अपयशी कधीच दिसणार नाही, यश यांचा पाठलाग करतो आणि बाकीच्यांची मुले मूर्ख असतात ते यशाच्या मागे धावतात. देशात यांच्याच मुलांच्या वाट्याला यश का? आणि इतरांची मुले अपयशी का ? या मागचे राजकारण आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना कधी कळणारच नाही किंबहुना हे राजकारणी कळू देणार नाही.

भोंगा लावायचा, हनुमान चालिसा म्हणायचा, कपडे कोणते घालायचे, मटन कोणतं खायचं, कोणता जनावर तुझा कोणता माझा, हा थोर पुरूष तुझा हा माझा, यासाठी हे सर्व हलकट राजकारणी भांडतील, एकत्र येतील पण तुमच्यासाठी एखादी नवीन स्थिर रोजगार योजना आणुन पाच-दहा लाख विद्यार्थ्यांना स्थिर रोजगार दिल्याचे एकातरी राजकारण्याचे नाव आपल्याला सांगता येणार नाही आणि याउलट आता नोकरीत असलेले नोकरीवरून कसे काढता येतील ? व त्यांना घरी कसे बसवता येईल ? यासाठी मात्र यांच्या योजना लगेच तयार होतात.
कर वाढवण्याच्या, किमती वाढविण्याच्या, स्वतःचा पगार पेंन्शन वाढवण्याच्या योजना लगेच तयार होतात व मंजूरही होतात. मात्र आमच्या नोकऱ्या काढायला, दिलेल्या परिक्षेंचे निकाल लावायला आपल्याला नेहमीच उशीर का होतो?

तुमच्या साठी आम्ही आत्मनिर्भर भारत बनवत आहोत, खूप स्टार्ट योजना सूरू केल्यात याचा तुम्ही लाभ घ्या असं वारंवार तुम्ही आम्हाला सांगता, पण तुमच्या बोलण्यातील विरोधाभास खरच तुम्हाला तरी कळतो का? एका बाजुने देशात तुम्ही एकाधिकारशाही निर्माण करत आहात, दोन-तीन उद्योग पतीच्या ताटात सर्वच वाढून ठेवलयं आणि आता आम्ही कुठला धंदा करायचा ? ते आपणच सांगा.

एकदाचा आम्ही धंदाही सुरू केला, मालही बनवला पण तो घेणार कोण? कारण बाजारात ग्राहक म्हणून फिरणारे हे सर्वच माझ्यासारखे बेरोजगार आहेत. माझा माल घेणारे,रोजगार असणारे व खिशात पैसे असणारे ग्राहक कुठं आहेत? माझा स्टार्ट अप चालण्यासाठी देशात रोजगार आवश्यक आहे ज्यामुळे खिशात पैसे येतात. तुम्ही मूळ नसलेला झाड लावत आहात त्यामुळे तुमच्या बहुतेक स्टार्ट अप योजना तोंडघशी पडणार आहेत, हे लक्षात ठेवा.

पेन्शन असणारे लोक आज नाही उद्या मरतील, त्यामुळे ते ग्राहक संपतील, स्थिर रोजगार असणारे लोक काहीच उरले आहेत, त्यांना भविष्यात पेन्शन नाही त्यामुळे त्यांच्याकडून खूप मागणी येण्याची शक्यता नाही, बाकीचे उच्चभ्रू यांचा तर वेगळाच मार्केट आहे आणि उरले आमच्यासारखे खूप सारे गरीब ज्यांच्याजवळ रोजगार नाही, खिशात मोजकेच पैसे त्यांच्या भरवश्यावर आत्मनिर्भर भारताची कल्पना करणे म्हणजे रेड्याला दूध देण्यास समर्थ करण्यासारखी कल्पना आहे.

पाया बांधायच्या आधी घर बनवू नका. आत्मनिर्भर भारताचे खोटं स्वप्न दाखवून दलिंदर जीवन आमच्या वाट्याला देऊ नका. याउलट रोजगार युक्त भारत बनवा, कमी अधिक प्रमाणात व नियमितपणे स्थिर रोजगारात आम्हा तरूणांना सामील करा. स्थिर रोजगारामुळे तुमचे मार्केट, मागणी, स्टार्ट अप, उद्योग व अर्थव्यवस्था हे सर्वच योग्य राहतील व फक्त स्थिर रोजगाराच्या बदल्यात तुमचा आत्मनिर्भर भारत आम्ही तुमच्या हवाली करतो.

विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या राजकारण्यांनी तुमच्यासमोर एक जेवनाचं ताट वाढलाय ज्यात दोनच मेनू आहेत "एक देव आणि दुसरा धर्म" तुम्ही कोणताही घास आपल्या आयुष्यात भरा विजय त्यांचाच होणार आहे व तुम्ही कायम हरणार आहात त्यामुळे राजकारण्यांच्या मनाने खाऊ नका, केवळ भाषणात बोललेल्या मोठ्या मोठ्या शब्दात अडकू नका, त्यांना जे पाहिजेय ! तेच तुम्ही करतायं ! त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे? हे त्यांच्यासाठी महत्वाचं राहत नाही व तुम्ही आज्ञाधारक बनल्यामुळे तुमची मागणी राजकारण्यांसाठी कडकडीची राहत नाही.

तुम्हाला तुमच्या हक्काची संधी मिळणार नाही अशाच प्रकारची व्यवस्था ते निर्माण करत आहेत. तुमच्या मेंदूत ताण, निराशा, अकार्यक्षम असल्याची भावना निर्माण करण्याचा हळूवारपणे प्रयत्न करत आहेत कारण त्यांना अशीच डोकी हवीत. ज्यामुळे त्यांचा उद्देश कायम सफल होत राहील. अशा डोक्यांची विभागणी करणे सोपे होते व या डोक्यात हवी ती विचारधारा सावकाश व पध्दतशीरपणे भरता येते. त्यानंतर अशी डोकी सत्तेचे समर्थक बनतात व सत्तेला प्रश्न विचारणे बंद करतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांनो जागरूक व्हा, वोटिंग मशीनवर दोन पक्षाशिवाय इतरही चांगले उमेदवार असतात याकडे लक्ष द्या, कोणत्याही राजकारणी पक्षाला समर्थन करतांना एकतर्फी विचारधारेला खतं पाणी घालू नका, जसे प्रत्येकात दोष असतात तसेच सत्तेतही दोष असतात त्यामुळे मी सत्तेचा विरोध का करत नाही ? असा प्रश्न स्वतः ला विचारा, कुठल्याही रंगाचा झेंडा हातात पकडतांना हजारदा विचार करा कारण भारतातील कुठल्याही धर्माच्या झेंड्यात तुम्हाला अंधाराशिवाय काहीच मिळणार नाही.

© प्रा.आकाश
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय
ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र
profakash123@gmail.com
26/5/2022