राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महागाईने होरपळणाऱ्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) मोठी कपात केली आहे. यामुळे राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैसे, तर डिझेल 1 रुपया 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शनिवारीच पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 व 6 रुपयांची कपात केली. यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 9.50 रुपये, तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवस राज्य सरकारनेही व्हॅट कपात करुन जनतेला दिलासा दिला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी दरकपात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यांना महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सल्ला दिला होता. पण, त्याला महाराष्ट्रासह कोणत्याही राज्याने सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर स्वतः केंद्रानेच शनिवारी पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कांत कपात करुन जनतेला दिलासा दिला होता. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यांना जनतेला दिलासा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी राज्यातील भाजप नेत्यांनीही सरकारकडे दरकपातीची मागणी केली होती. जनतेचाही या प्रकरणी सरकारवर मोठा दबाव होता. त्यानुसार, उद्धव ठाकरे सरकारने रविवारी पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करुन जनतेला दिलासा दिला. पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

राज्य सरकारने व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होईल. तर डिझेल 95 रुपये 84 पैसे प्रतिलिटर दराने मिळेल. सरकारच्या निर्णयामुळे राज्यात दोन दिवसांत पेट्रोल 11 रुपयांनी 58 पैशांनी, तर डिझेल 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.