वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने बिलांमध्ये केलेल्या गोंधळाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आणि अनुभवल्या आहेत, पण हरयाणाच्या सिरसामध्ये वीज विभागाने केलेला एक गोंधळ ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. येथील कलांवली परिसरामधील एका राईस मिलला वीज कंपनीने तब्बल 90 कोटी रुपयांचे बिल पाठवले आहे. ही गोष्ट तांत्रिक गडबडीमुळे झाल्याचे वीज विभागाने नंतर स्पष्ट केले.  
      सामान्यपणे कंपनीचे बिल हे पाच ते सहा लाखांपर्यंत येते, परंतु लॉकडाउनच्या कालावधीमध्ये बंद पडलेल्या या राईस मीलला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिल पाठवण्यात आल्याने राईस मीलच्या संचालकांची झोपच उडाली. हा संपूर्ण प्रकार सिरसा येथील कलांवली परिसरात असणाऱ्या गणेश राइस इंडस्ट्रीज या राईस मीलसोबत घडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वीजेचे बिल पाठवण्यात आल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. राईस मिलच्या संचालकांनी सांगितले की सामान्यपणे आम्ही जेवढी वीज वापरतो त्यानुसार महिन्याला पाच ते सहा लाखांच्या दरम्यान बिल येते. मात्र यंदा तर वीज बिलाच्या आकड्याने धडकीच भरवलीय. एखाद्या वेळेस कारभार आधीप्रमाणे सुरु असता तर बिल अधिक येणे समजू शकतो मात्र लॉकडाउनमुळे राईस मील बंद असतानाही एवढं बिल आल्याने आश्चर्य वाटत आहे.