प्रतिनिधी, २८ जानेवारी २०२२ :- मुंबईमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे मात्र दुसरीकडे संधीसाधू भामटे याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. मुंबई स्थित दिंडोशी क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्रांची विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्यास दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं नाव मुजीब वसीम खान असून तो १५०० रुपयांना कोविड १९ लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्रांची विक्री करत होता. 

    या आरोपीने अनेकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस तपास करत आहेत. आजही दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच प्रवासात मुभा देण्यात येत आहे. याचाच फायदा हे भामटे घेत असल्याचे पोलिस सांगतात. बनावट लसीकरणाच्या प्रमाणपत्रामुळे लस न घेतलेले अनेक जण सार्वजनिक वाहतुक सेवेतून प्रवास करतात. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो.