प्रतिनिधी, ३१ जुलै २०२१ :- ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला नवे नियम लागू होणार असून 1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबंधीच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय, नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या नियमांतही बदल झाले आहेत. त्यामुळे तुमचा पगार किंवा पेन्शन सुट्टीच्या दिवशीही खात्यामध्ये जमा होईल.

   रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये इतके आकारले आहेt. तर बिगर आर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरुन वाढवून 6 रुपये इतके करण्यात आले आहे. RBI च्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून महिन्याला पाच व्यवहार विनाशुल्क करता येतात. यामध्ये अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करणेही ग्राह्य ठरले जाते.

    1 ऑगस्ट २०२१ पासून म्हणजेच उद्यापासून पेन्शन, वेतन आणि ईएमआय यासारख्या महत्वपूर्ण व्यवहारांसाठी सुट्टी असल्यास ताटकळत राहावे लागणार नाही. रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या नियमांत बदल केले आहेत. NACH ही यंत्रणा NPCI कडून हाताळली जाते. या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डिव्हीडंट, व्याज, वेतन यासारखे व्यवहार पार पडतात. सध्या NACH ही यंत्रणा बँका सुरु असतानाच काम करते. परंतु 1 ऑगस्टपासून ही यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कार्यरत राहील.

   एनएसीएच (NACH-National Automated Clearing House) सेवा 1 ऑगस्टपासून 24×7 कार्य करणार आहे. याचा फायदा नोकरी करणार्‍यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता रविवारीही पगार खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. Nach सेवा एनपीसीआयद्वारे चालविली जाते. याद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते. होय, पगार देणे, भागधारकांना लाभांश देणे, व्याज देणे, पेन्शन हस्तांतरित करणे यांसारखे आणि याशिवाय दर महिन्याला वीज, टेलिफोन, पाण्याची बिले दिली जातात.

  आयसीआयसीआय बँकेनेही आपल्या नियमावलीत बदल केले आहेत. आयसीआयसीआय बँकेकडून रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. एका महिन्यात फक्त चारवेळाच बँक खात्यामधून पैसे काढता येणार आहे. त्यापेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागतील. तसेच एका महिन्यात केवळ एक लाख रुपयांची ट्रान्झेक्शन लिमीट ठेवण्यात आली आहे. यापेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.