अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या शासनाकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करुन सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरवर्षी शासनाकडून उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेत येतील त्यांना मीड डे मील; तसेच पोषण आहार सुरु केला होता. मात्र, कोरोनामुळे सध्या ही योजना बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागतील गरीब विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शासकीय अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेतून विद्यार्थ्यांना पोषण आहाराची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी हा निर्णय घेत तब्बल १२ कोटी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून १ हजार कोटी २० लाख रुपयांची रक्कम थेट १२ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.हा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी घेतला आहे. दुर्गम भागातील आदिवासी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना उपयोगी पोषण आहार सध्याच्या काळामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.