उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर महिन्यातच शेतकयांच्या वीज जोडण्या कापू नयेत, असे आदेश दिल्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही. लाइनमनने शेतातील सिंगल फेज डीपीचा वीजपुरवठा तोडल्याने रब्बी पिके डोळ्यादेखत जळत होती. ही बाब पाहवली जात नसल्याने गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाइव्ह ये "आता सर्व संपलं...' असे म्हणत विष घेतले. नारायण भगवान वाघमोडे असे विष घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बीडच्या खासगी रुग्णालयात ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

मालेगाव बुद्रुक येथील शेतकरी नारायण यांच्या शेतात सिंगल फेजची डीपी आहे. येथील वीज खंडीत केल्यानंतर वीज सुरळीत करण्याची विनंती केली होती. परंतु मोरे यांनी ऐकले नाही. २४ डिसेंबर रोजी नारायण यांनी कीटकनाशक प्राशन केले होते. लाइव्ह व्हिडिओ पाहत काही तरुणांनी घटनास्थळी जात वाघमोडे यांना गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. येथे प्राथमिक उपचार करून वाघमोडे यांना बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. वाघमोडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी मालेगाव बुद्रुक येथील लाइनमन विठ्ठल मोरेने गावठाणचा १०० केव्हीचा ट्रान्सफॉर्मर कुरणपिंपरी येथील शेतकऱ्यांना खासगी स्वरूपात लाखोंना विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.