राज्यातील काही ठिकाणी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत होणारी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर मुंबईत अशीच गर्दी होत राहिली तर आणखी कडक निर्बंध करणार असल्याचा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“आज रस्त्यावरचं ट्राफिक बघून मी आश्चर्यचकित झालो. मी काल नेमकं काय बोललो अशी एकदा चौकशीही केली. मी चुकून सगळी बंधनं उठवली असं तर म्हणालो नव्हतो ना याबद्दल दोघा तिघांना विचारलं. मुंबई किंवा महाराष्ट्रात आपण बंधनं उठवलेली नाहीत. अजूनही करोनाचा धोका संपलेला नाही. जर का आपण गाफील झालो तर संथगतीने सुरु होणाऱ्या आयुष्याला पुन्हा ब्रेक लागेल. मुंबईत पुन्हा अशीच गर्दी होत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.