मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मालवणी परिसरातील एक चार मजली इमारत दुसऱ्या एका इमारतीवर कोसळली. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मदत जाहीर केली आहे.
           या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.
         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन जखमी रहिवाश्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे ही उपस्थित होते.
         दरम्यान या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.