राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असतानाच आता परीक्षेसाठी आग्रही असणाऱ्या याचिकाकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. 

तेव्हा पासून मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करू नये, अशी याचिका कर्त्यांची मागणी आहे. यामध्ये धनंजय कुलकर्णी यांचा समावेश आहे. 

या पार्श्वभूमीवर धनंजय कुलकर्णी यांना सोशल मीडियावर दोन व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. परीक्षा घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा घेण्याची मागणी करू नका. अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशी धमकी देण्यात आली आहे. या नंतर धनंजय कुलकर्णी यांनी कोथरूड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रथमेश पाटील आणि भगवान ढाकणे या दोघांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला आहे.