महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हा मुख्यालयावर होणाऱ्या झेंडावंदनाचा मान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून आला आहे. रायगडचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक संतप्त झाले असून त्यांनी विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जानेवारीत आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती, परंतु विरोधामुळे तो निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून वाद उफाळला आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक यांनी दोन्ही मंत्र्यांना समान संधी देण्याची मागणी केली असून खासदार सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. आमदार महेंद्र दळवी यांनीही भरत गोगावले यांनाच पालकमंत्री करण्याची मागणी करत झेंडावंदनाला विरोध दर्शवला आहे. रायगड कार्यकारिणीत या मुद्द्यावर बैठक होणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.