बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षांहून अधिक काळ लोटला असतानाही त्यांची नावे मतदार यादीत कायम असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर पंधरा वर्षांपूर्वी येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही आजही मतदार यादीत असल्याचे त्यांनी उघड केले आहे. गायकवाड म्हणाले की, मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार अशा मतदारांची यादी दिली आहे ज्यांची नावे दोन ठिकाणी नोंदवली गेली आहेत. मात्र, आजवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. निवडणूक आयोगालाही याबाबत माहिती देण्यात आली असता, त्यांनी ‘बोगस नावे काढू नका’ अशी भूमिका घेतल्याने हा प्रश्न अधिक गंभीर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गायकवाड यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की, अनेक मतदार प्रत्यक्षात ग्रामीण भागात राहतात, परंतु शहरी भागातील निवडणुकीसाठी आपले नाव तिथे नोंदवतात. त्यामुळे दुहेरी मतदानाचा संशय निर्माण होतो. अशा मतदारांकडे दोन्ही ठिकाणी नावे असल्यामुळे ते दोन्ही ठिकाणी मतदान करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाने तत्काळ चौकशी करून योग्य ती दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की, राज्यातील तिन्ही पक्ष — शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) — यांच्यात महायुती होण्याची सर्वांचीच इच्छा आहे. बुलढाणा जिल्ह्यात युती करण्याचा कल स्पष्ट असून अंतिम निर्णय आगामी बैठकीनंतर घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, युतीच्या माध्यमातून मतदारांना एकसंध संदेश देणे हेच उद्दिष्ट असून स्थानिक पातळीवर मतभेद न ठेवता निवडणुका लढवण्याची भूमिका नेत्यांची आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत आमदार गायकवाड म्हणाले की, संजय राऊत ही एक विध्वंसक प्रवृत्ती आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला आणि आता आघाडीतील पक्ष संपवण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेसला ते मान्य होणार नाही, हे आम्ही आधीच सांगितले होते. त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एका मतदारांपर्यंत जर तीन वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका गेल्या, तर ते मतदाराला पटत नाहीत. मतदारांना स्पष्ट आणि स्थिर नेतृत्व हवे असते, असेही त्यांनी म्हटले.
बुलढाणा जिल्ह्यातील बोगस नावे आणि दुहेरी नोंदणीचा मुद्दा हा लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा असून प्रशासनाने या आरोपांची गंभीरतेने दखल घेऊन पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.










