
अहमदनगर
डिजिटल युगात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणी काय करेल, हे सांगता येणं अशक्य झालंय. लाईक्स, फॉलोअर्स आणि कमेंट्सच्या हव्यासात अनेकजण धोकादायक स्टंट्स करताना दिसत आहेत. मात्र, अशाच एका स्टंटने अहमदनगरमध्ये एका तरुणाचा जीव धोक्यात आला आहे.
जामखेड शहरात रीलसाठी बनाव करताना एका युवकाला चक्क खरी फाशी बसली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला असला तरीही त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती आहे.
रीलसाठी ‘फाशी’चा स्टंट… आणि झालं भीषण वास्तव
ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडली. प्रकाश बुडा असं या तरुणाचं नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. सध्या तो जामखेडमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता. प्रसिद्धीसाठी त्याने “फाशी घेण्याचा” बनाव करत स्वतःचं चित्रीकरण (रील) सुरू केलं.
मात्र रीलच्या नशेत आणि निष्काळजीपणामुळे दोरी गळ्याला अडकली आणि तो खऱ्या अर्थाने फासावर लटकला. तो बेशुद्ध झाला आणि घटनास्थळी खळबळ उडाली.
वेळीच मदत मिळाल्याने जीव वाचला
ही घटना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या युवकाला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या तत्परतेमुळे प्रकाश बुडा याचा जीव सध्या तरी वाचलेला आहे, मात्र प्रकृती गंभीर आहे.
सोशल मीडियाच्या हव्यासाला लगाम!
या घटनेनंतर समाजात संतापाची आणि चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ करणं हे किती भयंकर परिणाम घडवू शकतं, हे या घटनेतून स्पष्ट झालं आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आवाहन केलं आहे की,
“फक्त काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी तरुणांनी आपला जीव धोक्यात घालू नये. लाईक्स, फॉलोअर्स यांच्यापेक्षा आपला जीव आणि सुरक्षितता अधिक महत्वाची आहे.”
तरुणांसाठी इशारा
देशभरात सध्या अनेक ठिकाणी रील्ससाठी धोकादायक स्टंट्स, रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट्स, इमारतींवर चढून शूटिंग अशा प्रकारांची संख्या वाढताना दिसत आहे. प्रशासन आणि समाजाकडून वारंवार इशारा दिला जात असूनही काही तरुण याकडे दुर्लक्ष करत आहेत.
नगरमधील ही घटना डोळे उघडणारी असून, आता तरी प्रत्येकाने स्वतःची सुरक्षा, सुजाणपणा आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करण्याचा विचार करायला हवा.