मुंबई- ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे येत्या रविवारी नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गुन्हे मागे घेताच मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यासाठी भाजपचा दरवाजा उघडला. महाराष्ट्राच्या राजकारणात असे प्रवेश काही नवीन नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार इन्कमिंग आउटगोइंग सुरु आहे. त्यातच ठाकरे गटातून बरेचसे नेतेमंडळी, पदाधिकारी भाजपात आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांना याचा फायदा होणार आहेच मात्र ठाकरे गटाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आता भाजपा वॉशींग मशीन असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतेच कारण असे अनेक नेते मंडळी भाजपात आहेत. ज्यांच्यावर भाजपनेच घोटाळ्याचे, आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केलेत आणि भाजप पक्षात जाऊन त्यांच्यावरचे गुन्हे मागे तरी घेण्यात आलेत किंवा त्यांची ईडी चौकशी थांबलीय. त्यामुळे विरोधक सातत्याने ओरडून ओरडून भाजपा कशी दुटप्पी आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. अशोक चव्हाण, अजित पवार, राजन साळवी यासारखे नेतेमंडळी पदाधिकारी त्यांच्यावर आधी आरोप झाले आणि त्यानंतर काही दिवसाने ते महायुतीसोबत सामील झाले. त्यामुळे कुणावर कधी आरोप होईल आणि कोण कुणासोबत जाईल हे सांगता येत नाही.
तसंच मारहाण आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांमुळे सुनील बागुल व मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश रखडला होता. मात्र तक्रारदाराने गुन्हा मागे घेतल्याने भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांच्या माध्यमातून लावलेला भाजपचा राजकीय ट्रॅप यशस्वी झाला अशी चर्चा आहे. सुनील बागुल आणि श्री राजवाडे यांचा प्रवेश दोन आठवड्यापूर्वीच अपेक्षित होता. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्याची सर्व तयारी देखील झाली होती. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे भाजपने तो कार्यक्रम स्थगित केला होता.







