बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. गेवराईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गेवराईत काल हाकेंच्या पुतळ्याचं ज्या चौकात दहन करण्यात आलं. त्याच चौकात हाके आले होते. याच ठिकाणी विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील जमले होते. दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचं दिसून आलं. लक्ष्मण हाकेंच्या गाडीची पुढील काच फुटल्याचं पाहायला मिळालं.
बीड जिल्ह्यातील गेवराईत सुरु असलेला जमाव पांगवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. लक्ष्मण हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.








