गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. रस्त्याचं काम अनेक ठिकाणी रखडलंय. नागोठणे, कोलाड, गडप, लोणेरे, चिपळूण, बावनदी संगमेश्वर निवळी, हातखंबा, पाली आणि लांजा इथले पूल अजूनही अपूर्ण आहेत. माणगाव, इंदापूर बायपास रस्ते पूर्ण झालेले नाहीत. पनवेल, पळस्पे, पेण, कासू इंदापूर परिसरातही रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. सर्व्हिस रोडवर नागोठणे,गडब, कोलाड, तळवली, लोणेरे, संगमेश्वर आणि लांजा इथे खड्डे पडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर सूचना फलक, लाईट्स, ड्रेनेज लाईन, बॅरिकेट्स सुविधा केंद्र नाहीत. आमटेम, कोलेटी, सुकेळी,टोल या परिसरात अजूनही जमीनीचे वाद आहेत.
महामार्गाच्या दुर्दशेमुळे अनेकांचे बळी या अपघातामुळे गेले आहेत. रुंद रस्ते झाल्यावर प्रवास सुखकर होईल याची १७ वर्ष प्रत्येक कोकणकर वाट पाहतोय. पण त्यांना अनेकदा निराशेलाच सामोरं जावं लागतंय. महामार्गाच्या डागडुजीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ कोटी मंजूर केलेत. तर हा महामार्ग लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलंय. अनेकदा डेडलाईन देण्यात आल्या आता डिसेंबर २०२५ ही नवीन डेडलाईन आल्यामुळे मुंबईकरांना यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.







