मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू जवळपास २० वर्षांनी एकत्र आले.त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आनंदले. यानंतर २७ जुलै २०२५ रोजी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. येत्या महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची युती होईल अशी चर्चा अधिकच होऊ लागली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंकडून वारंवार एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यातच आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सहकुटुंब दादरमधील कृष्णकुंज इथे गणपती दर्शनासाठी यावे, असे निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंचं निमंत्रण स्वीकारल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याचे समजत आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब बुधवारी म्हणजेच २७ ऑगस्टला संध्याकाळी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित असतील.







