मुंबई, मालाड (मालवणी) : अक्सा समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी फिरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा जीव वाचवण्यात जीवरक्षकाने तत्परता दाखवली.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रहीम (वय १२, रा. आझमी नगर, गेट क्रमांक ७, नैमानी रोड, ७ नंबर मशीदजवळ, मालाड-मालवणी) हा सकाळी अंदाजे २:२५ वाजता अक्सा बीचवर आला होता. किनाऱ्यावर पाणी ओसरले आहे असा भास होऊन तो आत गेला. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊ लागला आणि बुडण्याच्या स्थितीत पोहोचला.
तेवढ्यात दृष्टी कंपनीचे जीवरक्षक मन वैती यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात उडी मारून अब्दुल रहीम याला सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. या बचाव कार्याची माहिती मालवणी पोलिसांनी दिली आहे.
स्थानिकांच्या मते, यापूर्वी देखील अशा अनेक घटना अक्सा बीच, मढ सिल्व्हर बीच व दानापानी बीच परिसरात घडल्या आहेत. यामुळे समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी वारंवार होत आहे. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी अधिक जीवनरक्षकांची नेमणूक करण्याची गरज तातडीची असल्याचे स्थानिकांनी सांगितले.








