मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे 27 ऑगस्टला मुंबईकडे आंदोलनासाठी निघणार आहेत. जरांगे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका करतानाही दिसतात. मात्र आता जरांगे यांनी फडणवीसांच्या आईचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा नेत्यांनी जरांगे यांना सुनावलं आहे. तसेच या प्रकरणी भाजपने जरांगे पाटलांनी अखेरचा इशाराही दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी तर थेट जरांगे यांना धमकीवजा इशाराच दिला आहे.नितेश राणे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल ते अपशब्द वापरत असतील तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं.’
तर दुसरीकडे आमदार परिणय फुके यांनी म्हटलं की, ‘पुढे त्यांनी असं खालच्या दर्जाचं किंवा वैयक्तिक वक्तव्य केलं तर याचं उत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सक्षम असतील. ही त्यांनी शेवटची वॉर्निंग समजावी.’
दरम्यान यावर जरांगे यांना विचारलं असता त्यांनी भाजपाचा आरोप फेटाळला आहे. ‘सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त त्यांना काहीतरी कुरापती उकरून काढायच्या आहेत. आरक्षण द्यायची वेळ आली तर आता आईला पुढे करत आहे. त्यांच्या आईला काही शब्द बोललो असेल तर ते मी ते विधान मागे घेतलेले आहे. असं जरांगे म्हणाले.










