मराठ्यांना आरक्षण मिळावं. यासाठी जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी काही अटी-शर्तींसह जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास परवानगी दिली आहे. तत्पूर्वी अंतरवाली सराटीहून मुंबईकडे हजारो मराठ्यांसह मनोज जरांगे शेकडो वाहनांसह निघाले असून महाकाळा अंकुशनगर येथे कुटुंबियांकडून मनोज जरांगे यांचं औक्षण करण्यात आलं. दरम्यान मनोज जरांगे यांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मुलगा शिवराज याने त्यांना दोन कवड्याच्या माळा घातल्या. यावेळी जरांगे पाटील यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्यांनी मुलांची समजूत काढली.
एकीकडे जरांगे मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका करत आहेत.तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदेंनी मौन बाळगलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरे गावाला जाण्याचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंना पुढे केले जाणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.









