सिनेमा आणि शेती — दिसायला दोन वेगवेगळे जग, पण दोघांचा आत्मा एकच आहे… मेहनत, जोखीम आणि आशा.
शेतकरी पिकाची पेरणी करतो, दिवस-रात्र घाम गाळतो, पाऊस, वादळ, कर्ज आणि बाजारभाव यांचा सामना करत शेवटी आपले पीक बाजारात घेऊन जातो. पण त्या पिकाला योग्य भाव मिळेल का, हे नशिबावर अवलंबून असतं.
नेमकी हीच कथा अनेक सिनेनिर्मात्यांची आहे.
सिनेदिग्दर्शक व निर्माता महिनोन्महिने, कधी वर्षानुवर्षे सिनेमा तयार करतात — कथानक, कलाकार, चित्रीकरण, संपादन, संगीत या सर्व गोष्टींसाठी प्रचंड पैसा, वेळ आणि भावनांची गुंतवणूक करतात. पण जेव्हा सिनेमा तयार होतो, तेव्हा त्याची खरी लढाई सुरू होते — वितरक, थिएटर आणि प्रेक्षक मिळवण्याची.
दोघांची सुरुवात सारखीच असते — शेतकरी जसा कर्जावर बियाणं घेतो, तसाच निर्माता व्याजाने पैसा उचलून सिनेमा उभा करतो. शेतकऱ्याला पीक येईल का, हे नशिबावर असतं; आणि निर्मात्याला सिनेमा विकला जाईल का, हे मार्केटवर अवलंबून असतं.
शेतकरी जसा आपलं पीक घेऊन बाजारात उभा असतो, तसाच निर्माता आपल्या सिनेमासह उभा असतो. पण जर पिकाला व्यापारीच न मिळाले, तर मेहनत वाया जाते; आणि जर सिनेमा विकत घेणारा वितरकच नसेल, तर तो कलाकृतीच्या स्वरूपात बंदिस्त होऊन राहतो.
आज अनेक निर्माते आर्थिक संकटात सापडले आहेत. काहींनी तर अतोनात कर्जबाजारी होऊन आत्महत्याही केल्या, पण अशा घटना बहुतेक वेळा लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा जसा वेदना देतो, तसाच या निर्मात्यांच्या कहाण्याही त्या दु:खाच्या सावलीत हरवतात.
सिनेमाच्या जगात एक मात्र वेगळेपण आहे — कलाकार. एखाद्या सिनेमात झळकलेला कलाकार जर लोकांच्या पसंतीस उतरला, तर पुढे त्याच्यासाठी दारं उघडतात, दहा सिनेमे त्याला सहज मिळतात, आणि तो स्टार बनतो. पण निर्माता मात्र तिथेच थांबतो, त्याच्यावरचे कर्ज आणि संकट मात्र कायम राहतात.
आजची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे — “सिनेमा कसा आहे?” हेही पैसे ठरवतात.
सिनेमा जगतात आता “भाडोत्री रिव्ह्यू” देणारे उभे राहिले आहेत. पैसे दिले तर सिनेमाचं कौतुक, नाहीतर कितीही उत्कृष्ट कलाकृती असो — तिला दोन स्टार देऊन दडपून टाकतात. पाहा ना, “चक दे इंडिया”सारख्या प्रेरणादायी चित्रपटालाही एकेकाळी दोन स्टार देणारेच बसले होते.
हे वास्तव वेदनादायक आहे. कारण दोन्ही क्षेत्रांत — शेतीत आणि सिनेमात — परिश्रम, भावना आणि जिवाभावाची गुंतवणूक आहे.
शेतकरी मातीवर प्रेम करतो, निर्माता कलेवर. दोघेही “फळ मिळेल” या आशेवर जगतात.
आणि म्हणूनच —
शेतीशिवाय पोट भरत नाही, आणि मनोरंजन, संगीत, कलेशिवाय माणूस जगू शकत नाही.
दोघेही जीवनाच्या पोषणाचे दोन आधारस्तंभ आहेत — एक शरीराचं पोषण करतो, आणि दुसरा मनाचं.
समाजाने आणि व्यवस्थेने आता या दोघांनाही समजून घेण्याची वेळ आली आहे.
कारण शेती आणि सिनेमा — दोन्ही आपल्या संस्कृतीचे पोषण करतात, फक्त एक पोट भरतो, आणि दुसरा मन.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव










