गोपाळगंज (बिहार) :
सायबर फसवणुकीविरुद्धच्या मोठ्या कारवाईत बिहार पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी आणि सायबर गुन्ह्याशी संबंधित अनेक साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई गोपाळगंज जिल्ह्यात करण्यात आली असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. या दोघांची ओळख अभिषेक कुमार आणि आदित्य कुमार अशी झाली आहे.
सायबर डीएसपी अवंतिका दिलीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १७ ऑक्टोबर रोजी गोपाळगंजमधील एका घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर रोकड आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये १ कोटी ५४९ हजार ८५० रुपये रोख, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी, ८५ एटीएम कार्ड, ७५ बँक पासबुक, २८ चेकबुक, दोन लॅपटॉप, तीन मोबाईल आणि एक आलिशान कार यांचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे की हे दोघे भाऊ गेल्या काही महिन्यांपासून सायबर फसवणुकीच्या माध्यमातून देशभरातील लोकांची दिशाभूल करत होते. विविध ऑनलाइन व्यवहार, कर्ज योजनांचे आमिष दाखवून आणि बनावट वेबसाइट्सच्या माध्यमातून हे आरोपी नागरिकांकडून पैसे उकळत होते. त्यानंतर हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमधून फिरवून शेवटी स्वतःच्या खात्यात वळवले जात.
पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यावरून या सायबर टोळीचा व्याप मोठा असल्याचे दिसून येत आहे. अनेक बँक पासबुक आणि एटीएम कार्ड विविध बँकांच्या नावाने नोंदवलेले असल्याचे तपासात उघड झाले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या नेटवर्कमागील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या कारवाईमुळे बिहार पोलिसांच्या सायबर शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. या प्रकरणामुळे राज्यात सायबर गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.








