मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज्यात वातावरण तापले असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिहारला यावे, तेथे त्यांना ‘पटक-पटक के मारेंगे असे आव्हान दुबे यांनी दिले होते. भाजपच्या या वाचाळवीर खासदाराला बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला.
“कसली ही तुमची अर्वाच्च भाषा? मराठी माणसांना मारण्याची भाषा कशी करु शकता? तुम्ही आपटून आपटून कोणाला आणि कसे मारणार आहात? मराठी भाषिकांच्या विरोधातील अरेरावी खपवून घेतली जाणार नाही” अशा शब्दात निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील मराठमोळ्या महिला खासदारांनी धारेवर धरल्याची माहिती आहे.
वर्षा गायकवाड यांचा संताप इतका तीव्र होता की, आजूबाजूच्या इतर राज्यांतील खासदारही क्षणभर गोंधळले. दरम्यान, “जय महाराष्ट्र”च्या जोरदार घोषणांनी लॉबी अक्षरशः दणाणून गेली. हे सगळं घडत असतानाच आसपासचे अनेक मराठी खासदारही तेथे आले आणि त्यांनीही दुबेंना जाब विचारला.







