महाड (प्रतिनिधी : रामदास चव्हाण)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे इच्छुक उमेदवारांची लगबग वाढू लागली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींना संधी मिळाली, तर काहींच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
वरंध जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला आरक्षण, तर वरंध पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला, आणि खरवली पंचायत समिती गणासाठी ओबीसी महिला आरक्षण घोषित झाले आहे. मागील निवडणुकीत या जिल्हा परिषद गटातून मनोज काळीजकर यांनी बाजी मारली होती, तर मनोहर रेशीम यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रतिस्पर्धी आता एकाच पक्षात आल्याने आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून वरंध पंचायत समिती गणात इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते. हा मतदारसंघ मंत्री भरतशेठ गोगावले यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीत सपना मालुसरे यांनी याच गणातून विजयी होत पंचायत समिती सभापतीपद पटकावले होते. आता मात्र या जागेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असून पक्षांतर्गत स्पर्धा चुरशीची होणार आहे.
दरम्यान, मंत्री गोगावले यांच्या कन्या वैशाली गोगावले-मालुसरे, नूतन गोपाळ मोरे (विद्यमान सरपंच, निगडे ग्रामपंचायत) आणि माजी सभापती सपना मालुसरे या तिन्हींची नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसरीकडे, या गणातून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही आपली ताकद दाखवली आहे. उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा कुमारी पूर्वा आनंद सुर्वे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांचा पाठिंबा त्यांना लाभल्याने लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात आता शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विरुद्ध उद्धव ठाकरे गट अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे वरंध पंचायत समिती गणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










